जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यात अद्याप ‘ऑटोमेटेड व्हेईकल फिटनेस टेस्टिंग सेंटर’ (AVTS) कार्यान्वित न झाल्यामुळे स्थानिक वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना (RTO) निवेदन देऊन फिटनेस चाचणीची जुनी पद्धत तात्पुरती सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
*२५० किलोमीटरचा प्रवास आणि आर्थिक भुर्दंड*
निवेदनात नमूद केल्यानुसार, जळगाव जिल्ह्यात फिटनेस सेंटर नसल्यामुळे वाहनधारकांना फिटनेस चाचणीसाठी नाशिक (२५० किमी) किंवा छत्रपती संभाजीनगर (१५० किमी) येथे जावे लागत आहे. लांबच्या प्रवासामुळे इंधन खर्च, टोल, वाहनांची झीज आणि दोन ते तीन दिवसांचा रोजगार बुडत असल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. विशेषतः लहान वाहनधारक आणि एकाच वाहनावर उदरनिर्वाह करणाऱ्या चालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक ठरत आहे.
*’ट्रान्झिशन पिरीयड’ जाहीर करण्याची मागणी*
वेळेवर फिटनेस प्रमाणपत्र न मिळाल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंड, वाहन जप्ती आणि विम्याच्या कामात अडथळे येतात. प्रशासकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नसताना वाहनधारकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. जोपर्यंत जिल्ह्यात नवीन सेंटर सुरू होत नाही, तोपर्यंत:
* पूर्वीप्रमाणे पारंपारिक/मॅन्युअल पद्धतीने फिटनेस चाचणी सुरू ठेवावी.
* किंवा योग्य असा संक्रमण कालावधी (Transition Period) जाहीर करावा.
*सदर मागण्या पूर्ण न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील ट्रक RTO कार्यालयात जमा करू.
निवेदनावर स्वाक्षरी
या मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सैय्यद शाहीद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. हजारो वाहनधारकांचा मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आरटीओ प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


