नाशिक: कर्नाटकच्या चोरली घाटात ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला कंटेनर चोरीला गेल्याच्या संशयातून नाशिकच्या एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.
नेमकी घटना काय?
इगतपुरी येथील रहिवासी संदीप पाटील यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, मुंबई-ठाणे परिसरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचे ४०० कोटी रुपये असलेला कंटेनर चोरीला गेल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. या संशयातून त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. तिथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
पाच संशयितांना बेड्या
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
* जयेश कदम
* विशाल नायडू
* सुनील धुमाळ
* विराट गांधी
* जनार्दन धायगुडे (मुंबई)
या प्रकरणातील आणखी दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप
तक्रारदार संदीप पाटील यांनी आपल्या तक्रारीत काही व्यावसायिक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता, “निष्पक्ष तपासासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी दिली.


