जळगाव (राकेश वाणी) – हिंदूंचा इतिहास शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. हिंदु धर्मावर कितीही आघात झाले, तरी हा चिरंतन धर्म संपुष्टात आला नाही आणि भविष्यातही येणार नाही. याचे कारण जेव्हा रावण जन्माला येतो, तेव्हा रामही जन्माला येतो. जेव्हा कंस जन्म घेतो, तेव्हा कृष्णही अवतार घेतो, जेव्हा औरंगजेब जन्माला येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजही जन्माला येतात. आपल्याला केवळ चांगल्या-वाईटाच्या लढाईत सत्प्रवृत्तींच्या पाठीशी अर्थात धर्माच्या बाजूने उभे रहायचे आहे. जेव्हा हिंदु संघटितपणे धर्महितासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करतील, तेव्हा धर्मविजय हा निश्चित आहे. त्याचप्रमाणे धर्माधिष्ठित कल्याणकारी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करण्यासाठी अर्थात रामराज्याचा दिशेने वाटचाल करण्यासाठी रविवार दि. १ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता मानराज पार्क येथील श्रीराम मंदिर संस्थानच्या मैदानावर ‘हिंदु राष्ट्र जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक श्री. प्रशांत जुवेकर यांनी दिली. सभेनिमित्त पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासह प. पु. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, विश्व हिंदु परिषदेचे देवगिरी प्रांताचे ललित चौधरी, सकल हिंदु समाजचे राकेश लोहार आणि समितीचे जळगाव शहर समन्वयक गजानन तांबट यांनी परिषदेला संबोधित केले.
हिंदू समाजाचे प्रभावी संघटन होण्यासाठी सभा ! – प. पु. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज
हिंदू समाजाचे प्रभावी संघटन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेला जळगावमधील अधिकाधिक हिंदुनी उपस्थित रहावे, तसेच या सभांच्या माध्यमातून हिंदू धर्माचे आचरण केल्याने होणारे लाभ, सण उत्सव आदर्शरित्या कसे साजरे करावेत याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले जाते, त्याचा लाभ सर्व हिंदुनी घ्यावा, असे आवाहन प. पु. महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केले.
सभेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने राष्ट्र, धर्म, अध्यात्म, देवता, सण – उत्सव, बालसंस्कार, आचारधर्म, व्यक्तिमत्व विकास, आयुर्वेद आदी अनेक विषयांवर ग्रंथ तसेच फलक यांचे अनमोल प्रदर्शन लावण्यात येणार आहे, त्याचा लाभ जळगावमधील सनातनी हिंदूंनी अवश्य घ्यावा असे आवाहन सद्गुरू जाधव यांनी केले. तसेच वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभेत उपस्थित 10 हजारहुन अधिक धर्मप्रेमी बांधव एकत्रितपणे संपूर्ण वंदे मातरमचे गायन करणार आहेत, असे सकल हिंदू समाजचे राकेश लोहार यांनी सांगितले.
या वर्षी सभेला प्रमुख वक्ते म्हणून ३० वर्षे सैन्यात ज्यांनी देशसेवा केली असे योद्धा लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा असून यांसह सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडये, हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजगृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर हे सभेला संबोधित करणार आहेत. या वर्षी सभेत प्रदर्शनात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता याचे उद्घाटन होणार असून सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहण्यास उपलब्ध असेल. जळगावकर शिवप्रेमी नागरिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी अवश्य याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे शहर समन्वयक श्री. गजानन तांबट यांनी केले.
३१ जानेवारीला सकाळी वाहनफेरी !
राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे आकस्मिक दुर्दैवी निधन झाल्याने राज्यात ३० जानेवारी पर्यंत दुखवटा पाळण्यात येत आहे. या पार्शवभूमीवर सभेच्या प्रसारानिमित्त ३० जानेवारी रोजी आयोजित केलेली वाहनफेरी ३१ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. बिग बाजार (नेहरू चौक ) येथून फेरीला आरंभ होऊन छत्रपती शिवराय स्मारक चौक पिंप्राळा येथे समारोप होणार आहे.


