अमळनेर (पंकज शेटे): देशात शेतीच्या जमिनीतील कार्बन पातळी सतत घटत असून सुपीकता कमी होत चालली आहे. पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी देशातील प्रमुख संस्थांनी 2021 मध्ये सामाजिक स्तरावर भूमी सुपोषण व संरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर जनजागरण अभियान सुरू केले. या अभियानामध्ये कृषी व पर्यावरण क्षेत्रात कार्यरत सामाजिक व धार्मिक संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतातील हजारो गावांमध्ये भूमिपूजन कार्यक्रमांच्या माध्यमातून भूमी सुपोषण व संरक्षण कार्याला चालना मिळाली. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता भूमीबाबत जागरूक होत आहेत .रासायनिकमुक्त शेतीकडे वळत आहेत. त्याचाच भाग म्हणून अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात १९ मार्च 2026 म्हणजेच गुढीपाडव्यास या राष्ट्रीय स्तरावरील चळवळीचा अमळनेरमधून प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भूमी मातेचा जन्मदिवस असतो. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ होत आहे.त्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, धार्मिक, सामाजिक व कृषी क्षेत्रातील अनेक महनीय व्यक्ती मार्गदर्शनासाठी येणार आहेत. 19 मार्च रोजी संपूर्ण भारतात समाजाच्या सहभागातून हे अभियान राबविले जाणार आहे.
कृषी व पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी अनेकदा चिंता व्यक्त केली, की शेतीच्या जमिनीचा भौतिक, रासायनिक व जैविक समतोल बिघडत चालला आहे. तसेच जमिनीत वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे येत्या काही वर्षांत उत्पादनावर विपरीत परिणाम संकटाच्या स्वरूपात समोर येऊ शकतो. भूमीतील जैविक कार्बन आवश्यकतेपेक्षा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे देशहित व शेतकरी हित लक्षात घेऊन सामाजिक संस्थांनी भूमी सुपोषणाच्या माध्यमातून सकारात्मक बदलाचे बीज रोवले आहे. मागील 5 वर्षांत देशातील 30 हजार गावांमध्ये व 54 हजार शहरी ठिकाणी भूमिपूजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
देशातील अनेक सामाजिक व धार्मिक संस्था, हजारो गोशाळा, स्वयंसेवी संस्था तसेच देशातील सर्व कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांशी संपर्क साधून या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत भूमिपूजन, भूमी सुपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, भूमी सुपोषण प्रयोगांचे प्रशिक्षण, संगोष्ठी, कार्यशाळा, जनजागृती शिबिरे, प्रदर्शने इत्यादींचेही ठिकठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. नागरी भागांमध्ये जैविक व अजैविक कचऱ्याचे विभाजन, जैविक कचऱ्यापासून खतनिर्मिती यांसारख्या उपक्रमांसाठी जनजागृती कार्यक्रमही राबविण्यात येतील. भूमी सुपोषणाशी संबंधित विविध साहित्य www.bhumisuposhan.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अमळनेरधील कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री ना. चौहान यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य तथा सहकार्यवाह भागैय्याजी, कनेरी मठाचे गादीपती परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या अभियान संचालनात राष्ट्रीय संयोजक पद्मश्री कृषक सुभाषजी शर्मा, संयोजक श्री. नवलजी रघुवंशी (इंदूर), सहसंयोजक श्री. आलोकजी गुप्ता (दिल्ली) यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभणार आहे.
श्री मंगळ ग्रह मंदिरात दाक्षिणात्य शैलीतील विश्वातील एकमेव श्री भूमी मातेची आहे . मातेच्या जन्मदिवच्या सुमुहूर्तावर श्री मंगळग्रह मंदिरातून भूमी सुपोषण या राष्ट्रीय स्तरावरील जनजागरण अभियानाचा प्रारंभ होणार आहे.हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. या अभियानाच्या निमित्ताने हजारो शेतकरी देशभरातून अमळनेरला येतील. येताना आपल्या शेतातील एक मूठ माती सोबत आणतील. या एकत्रित केलेल्या मातीचे पूजन होईल आणि ही पूजा झालेली माती गावोगावी वाटप केली जाईल. या कार्यक्रमासाठी अनेक महनीय व्यक्ती मार्गदर्शनासाठी येणार आहेत. भूमी सुपोषण करून देश सुजलाम्-सुफलाम् करण्याची ही जी अभियानाची सुरूवात होत आहे, ही आपल्या जिल्ह्यासाठी व खानदेश वासियांसाठीही अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आम्ही लवकरच तज्ञ मान्यवरांच्या नियोजनत्मक बैठकी घेणार आहोत.
*- डॉ. डिगंबर महाले, अध्यक्ष-मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर.*


