डिजिटल पिढी (राकेश वाणी) : आयडियल सेल्स असोसिएशन, जळगाव यांच्या वतीने सेल्स क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा “आयडियल सेल्स प्रीमियर लीग व पारितोषिक वितरण समारंभ” यशस्वीरीत्या पार पडला.
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरात सक्रिय असलेल्या आयडियल सेल्स असोसिएशनने सेल्स क्षेत्राशी निगडित लोकांसाठी जिल्हास्तरीय या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा मुख्य उद्देश खेळाडूंची गुणवत्ता ओळखणे व त्यांच्या कौशल्यांना अधिक वाव देणे हा होता. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून सेल्स क्षेत्रातील व्यक्तींमध्ये आपसी एकोपा, बंधुभाव व सौहार्द निर्माण व्हावे, परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, एकमेकांचा परिचय वाढावा तसेच व्यावसायिक, सामाजिक व नैतिक विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न अधिक बळकट व्हावेत, हा हेतू होता.
या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये स्पोर्ट्स हाऊस, एस.आर. ट्रेडिंग, मोबाइल डॉट कॉम, बी.वाय. शाह, आर अँड एस रिटेलर्स आणि मॅक्स मोबाइल या संघांचा समावेश होता. या स्पर्धेत सेल्स क्षेत्रातील एकूण ७८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी रियाझ बागबान (माजी नगरसेवक), फारूक शेख (स्पोर्ट्स हाऊस), गालिब हुसेन (दिवाशास हेअर ट्रान्सप्लांट सेंटर), मोहसिन बागबान (बागबान ट्रेडर), अफसर बागबान (न्यू मुंबई हार्डवेअर), इरफान खान (हॉटेल लझीज), राशिद खाटिक (एम.आर. ट्रेडर), इब्राहिम शेख (शेख एंटरप्रायझेस), हाफिज मुख्तार पटेल (अल-सफा हज अँड टूर्स) तसेच विशेष सहकार्य अकरम शेख (सरगम कंपनी) यांचे मोलाचे योगदान लाभले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वकार शेख, बख्तियार बागबान व इरफान अब्बासी यांनी आयोजक म्हणून विशेष परिश्रम घेतले. तसेच मुनाफ शेख, आबिद खाटिक, शफकत शाह, जमील अहमद, हनीफ खान, फैजान काकर, फिरोज शेख व शहाब शेख यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या अत्यंत चोखपणे पार पाडल्या.
या क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा व प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरला. अंतिम सामन्यात बी.वाय. शाह संघाने आर अँड एस रिटेलर्स संघावर मात करत शानदार विजय मिळवला.
यानंतर पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. अलहाज अब्दुल करीम सालार यांनी भूषवले. अध्यक्षतेची घोषणा मुनाफ शेख यांनी केली, अनुमोदन इरफान अब्बासी यांनी केले तर उद्देशपर भाषण बख्तियार बागबान यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच लाईव्ह कॉमेंट्री (थेट समालोचन) आसिफ मिर्झा सर यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून अलहाज इजाज मलिक, रियाझ बागबान, सलीम इनामदार, डॉ. शुऐब, इरफान सालार, मोहसिन बागबान, पत्रकार रईस अहमद, झकी अहमद, चेतन वाणी, राकेश वाणी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी काही मीडिया चॅनेलच्या पत्रकारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. अब्दुल करीम सालार, इजाज मलिक, रियाझ बागबान व सलीम इनामदार या सामाजिक कार्यकर्त्यांना अशोक स्तंभ सन्मान स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
सलीम इनामदार यांनी आपल्या भाषणात आयडियल सेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत ही स्पर्धा ऐतिहासिक व अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगितले. आयडियल सेल्स असोसिएशनने उत्कृष्ट व्यवस्थापनाचे उदाहरण सादर केले असून, विशेषतः सर्व मुस्लिम सेल्स व व्यावसायिकांना एका व्यासपीठावर एकत्र आणून असा भव्य उपक्रम राबविणे ही एक अभिनव व कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अलहाज अब्दुल करीम सालार यांनी आयोजन समितीचे अभिनंदन करत भविष्यातही संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी इक्रा कॉलेज कॅम्पसमध्ये स्टेडियमच्या धर्तीवर भव्य क्रीडांगण उभारण्याची घोषणा केली.
या प्रसंगी सर्वोत्तम गोलंदाज – अझहर शेख, सर्वोत्तम फलंदाज – मुदस्सिर शेख, सर्वोत्तम यष्टीरक्षक – हनीफ खान आणि सर्वोत्तम खेळाडू – अझहर शेख यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. अंतिम सामन्यात आर अँड एस रिटेलर्स संघाला पराभव स्वीकारावा लागला. विजेत्या बी.वाय. शाह संघाचे मालक अवैश शाह यांच्या संघाने विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली, तर उपविजेता ठरलेल्या आर अँड एस रिटेलर्स संघालाही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
आभार प्रदर्शन बख्तियार शेख यांनी केले. सामन्यादरम्यान सरगम डिटर्जंट पावडरचे गिफ्ट पॅक वाटप करण्यात आले तसेच पाहुण्यांचे स्वागतही सरगम डिटर्जंटच्या भेटवस्तू देऊन करण्यात आले. ही संकल्पना सर्वांना विशेष आवडली व तिचे भरभरून कौतुक करण्यात आले.
शेवटी वकार शेख यांच्या समारोपाच्या भाषणाने या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली.


