जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता अंतिम टप्पा गाठला असून, प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी स्वतः मैदानात उतरत प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. गणपती नगरातील स्वाध्याय भवन परिसरात त्यांनी कार्यकर्त्यांसह घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधला. या जनसंपर्क दौऱ्यादरम्यान देवकर यांनी स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या आणि प्रभागाचा प्रलंबित विकास केवळ महायुतीच करू शकते, असा विश्वास व्यक्त केला. “प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,” असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
या प्रचार दौऱ्यात गुलाबराव देवकर यांच्यासोबत प्रभाग १३ ‘ब’ चे उमेदवार नितीन तायडे आणि १३ ‘क’ चे उमेदवार प्रफुल्ल देवकर तसेच स्थानिक नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाध्याय भवन परिसरात रॅली काढत असताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी गुलाबराव देवकर व उमेदवारांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. या ‘होम टू होम’ भेटींमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. रॅलीमध्ये नामदेव चौधरी, मधुकर पाटील, माजी नगरसेवक अनिल काळे, पिंटू जाधव, सीए अजय जैन, पुरुषोत्तम चौधरी, विशाल देवकर यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. दिग्गज नेत्यांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे प्रभाग १३ मध्ये महायुतीचे पारडे चांगलेच जड झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.


