६७८ वाहनांवर कारवाई; ५९ गुन्हे दाखल करत जिल्हा प्रशासनाचा वाळू माफियांना इशारा
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६७८ वाहने अडकली असून, त्यांच्यावर १० कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईचा लेखाजोखा (१ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६):
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यांत झालेली कारवाई खालीलप्रमाणे आहे:
* कारवाई झालेली वाहने: ६७८
* एकूण आकारलेला दंड: १०,००,२६,७७८ रुपये (१० कोटी+)
* वसूल करण्यात आलेली रक्कम: ६,९९,७१,२५० रुपये
* दाखल झालेले गुन्हे: ५९
* जप्त केलेली यंत्रसामग्री: ०७
वाळू साठा आणि लिलावातून कोट्यवधींचा महसूल
जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात जिल्ह्यात ६८१८.२७ ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. यापैकी ४०३९ ब्रास वाळूचा लिलाव करून शासनाच्या तिजोरीत ६०.४९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उर्वरित वाळू नियमानुसार गरजूंच्या ‘घरकुल’ योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ दरम्यान १४ पैकी १३ वाळूगटांचा यशस्वी ई-लिलाव झाला असून, त्यातून ६०,२१० ब्रास वाळूसाठी ४.७९ कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला आहे.
आगामी नियोजन: मार्चमध्ये १७ नवीन वाळूगटांचा लिलाव
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये आणखी १७ वाळूगटांचा ई-लिलाव प्रस्तावित आहे. यासाठी भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाकडे खाणकाम आराखडा मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. याव्यतिरिक्त, नवीन ९६ वाळूगटांचे प्रस्ताव पर्यावरण अनुमतीसाठी सल्लागारांकडे पाठवण्यात आले आहेत.
“जिल्ह्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि परिवहन विभाग समन्वय राखून काम करत आहेत. दक्षता व गस्ती पथके २४ तास सक्रिय असून, अवैध प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.”
जिल्हा प्रशासन, जळगाव


