सुभाष धाडे, मुक्ताईनगर: तालुक्यात काल दि 27 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. संध्याकाळी 5 ते 6 च्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस झाला या पावसात परिपक्क झालेल्या केळी बागा उध्वस्त झाल्या. याचप्रमाणे गहू, मका, हरभरा, टरबूज यासारख्या रब्बी पिकांचेही अतोनात नुकसान झाले.
शेतकऱ्यांचे पिकांचे झालेल्या नुकसानीचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सकाळपासूनच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट नुकसानग्रस्त शेती गाठत पाहणी करीत प्रशासनास पंचनामे करण्या संदर्भात सूचना दिल्या. मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे, ता कृषी अधिकारी शिंदे यांनी अनेक भागातील शेती शिवारात भेटी देत नुकसानीची पाहणी केली.
तालुक्यातील सुकळी, दुई, पुर्नाड, उचदे, शेमळदे सह पूर्ण तालुक्यातील केळी सह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी बांधवांच्या ऐन हात तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात भरडला गेला.
प्रशासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून तातडीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.


