मुख्याधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ३३ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित; १ एकर जागा त्वरित देण्याची मागणी
चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील सर्वे नंबर ४२५/क मधील हिंदू स्मशानभूमीसाठी मंजूर असलेली १ एकर जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय जनमंच पक्ष मैदानात उतरला आहे. याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, तांत्रिक अहवाल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
चाळीसगाव शहरातील मालेगाव-धुळे रोड चौफुली भागातील महाराणा प्रताप चौकाच्या मागे, सर्वे नंबर ४२५/क मधील १.१७ हेक्टर आर (पावणे तीन एकर) जागा विविध समाजांच्या स्मशानभूमीसाठी नगरपालिकेने मंजूर केली आहे. यामध्ये १२ जुलै १९९१ च्या ठराव क्र. ११२३ नुसार, १ एकर जागा हिंदू स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे. मात्र, ३३ वर्षे उलटूनही ही जागा अंत्यसंस्कारासाठी खुली करण्यात आलेली नाही.
नागरिकांची ससेहोलपट
रेल्वे पलीकडील भागात असलेल्या पंचशील नगर, शिव कॉलनी, पोस्टल कॉलनी, आदर्श नगर, प्रभू रामचंद्र नगर यांसह विविध परिसराची लोकसंख्या ५० ते ६० हजारांच्या घरात आहे. या भागातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी ४ ते ५ किमी दूर रेल्वे पूल ओलांडून घाट रोडवरील स्मशानभूमीत जावे लागते. ही पायपीट थांबवण्यासाठी हक्काच्या स्मशानभूमीची गरज आहे.
अहवालात जाणीवपूर्वक खोडा?
संदीप लांडगे यांनी १० मे २०२३ पासून या जागेसाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर भूसंपादन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर रचना विभाग यांचे सकारात्मक अहवाल प्राप्त झाले आहेत. भूमि अभिलेख विभागाने जागेची मोजणी करून नकाशादेखील सादर केला आहे. मात्र, १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रांताधिकाऱ्यांनी विचारलेल्या एका खुलाशामुळे पेच निर्माण झाला आहे:
* मंजूर क्षेत्र ०.४० हेक्टर असताना ते ०.१९ हेक्टर का करण्यात आले?
* याबाबतचा खुलासा मुख्याधिकारी आणि नगररचना अभियंता गेल्या पाच महिन्यांपासून जाणीवपूर्वक टाळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
> “३३ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न प्रशासकीय अनास्थेमुळे रेंगाळला आहे. मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करून कायदेशीर पूर्तता करावी, अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल.”
संदीप लांडगे (प्रदेश सचिव, राष्ट्रीय जनमंच)
निवेदनावर ‘यांच्या’ आहेत सह्या
या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव शहराध्यक्ष प्रमोद डोंगरे, अमळनेर तालुका अध्यक्ष विनोद पवार, चाळीसगाव शहर युवक आघाडी अध्यक्ष अधिकार पाटोळे आदींच्या सह्या आहेत. प्रशासनाने यावर त्वरित दखल न घेतल्यास होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
म


