आमदार किशोर पाटील यांचा महावितरणला दणका; ८ तास वीज देण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
भडगाव | प्रतिनिधी : तालुक्यातील वडजी ३३/११ केव्ही सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी सबस्टेशनवर जोरदार ‘ठिय्या आंदोलन’ केले. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनानंतर महावितरणने तांत्रिक अडचणी सोडवून पूर्ववत ८ तास वीज देण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
ठेकेदाराच्या दिरंगाईचा फटका
भडगाव तालुक्यातील इतर गावांना दिवसा वीज मिळत असताना, केवळ वडजी सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांना ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. कोठली १३२ केव्ही सबस्टेशनवरून स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले, मात्र पोल टाकण्यातील अडचणी आणि ठेकेदाराची सुस्ती यामुळे हे काम रेंगाळले आहे.
बिबट्याची दहशत आणि शेतकऱ्यांचा संताप
परिसरात सध्या बिबट्याची मोठी दहशत आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरणे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरत आहे. त्यातच केवळ ७ तास मिळणारी वीजही खंडित स्वरूपात मिळत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या अन्यायाविरुद्ध वडजी, पांढरद, पिचर्डे, पळासखेडे, नालबंदी येथील शेकडो शेतकरी आक्रमक झाले होते.
अधिकारी धारेवर; आमदारांचा थेट हस्तक्षेप
आंदोलनादरम्यान तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. आमदारांनी तातडीने सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. आडतेकर यांना फोन लावून “शेतकऱ्यांना दिवसा आणि सलग वीज का मिळत नाही?” असा जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
> महावितरणचे आश्वासन: “कोठली ते वडजी वाहिनीचे काम लवकरच पूर्ण करून दिवसा सलग वीज पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना पूर्ववत ८ तास वीज पुरवठा केला जाईल.”
प्रमुख उपस्थितांची मांदियाळी
या आंदोलनात सुधाकर पाटील (शिवसेना तालुकाप्रमुख), अनिल पाटील (भाजप तालुकाध्यक्ष), राजेंद्र मोरे (उबाठा शिवशक्ती-भीमशक्ती), भाऊसाहेब परदेशी, विनोद बोरसे, जगदीश पाटील, संजय पाटील, स्वदेश पाटील यांच्यासह पांढरद, पिचर्डे व पळासखेडे येथील सरपंच, उपसरपंच आणि शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.


