अमळनेर (पंकज शेटे): शहरातील सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) मुली पळून जाऊन विवाह करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा निर्णयांमुळे मुलींचे भवितव्य आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करत, अमळनेर येथील महिला भगिनींच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.
प्रभाग क्रमांक 07 च्या नगरसेविका प्रा. योगिता सयाजीराव कापडणेकर यांच्या मार्गदर्शनाने अनेक महिलानी दिले निवेदन
या निवेदनात महिलांनी नमूद केले आहे की, जरी कायद्याने सज्ञान मुलीला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला असला, तरी अनेकदा हे निर्णय भावनिक दडपण, फसवणूक किंवा तात्कालिक आकर्षणातून घेतले जातात. याचा परिणाम केवळ त्या मुलीवरच नाही, तर संपूर्ण कुटुंबावर होतो.
प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
निवेदनाद्वारे महिलांनी प्रशासनासमोर काही महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत:
* अधिकृत पडताळणी: सज्ञान मुलीच्या विवाह नोंदणीपूर्वी तिची स्वेच्छा, मानसिक स्थिती आणि सुरक्षिततेची प्रशासकीय पातळीवर अधिकृत पडताळणी करण्यात यावी.
* पालकांशी संवाद: अशा प्रकरणांमध्ये शक्य असल्यास मुलीच्या पालकांना बोलावून मध्यस्थी प्रक्रिया राबवण्यात यावी.
* समुपदेशन अनिवार्य: महिला व बाल विकास विभाग किंवा संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत अशा जोडप्यांचे समुपदेशन करून त्याचा अहवाल अनिवार्य करण्यात यावा.
या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचे विविध दाखले आणि हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींचा संदर्भ देण्यात आला आहे. समाजात शांतता राहावी आणि मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे, या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे नगरसेविका प्रा. योगिता सयाजीराव कापडणेकर व इतर महिलांनी म्हटले आहे.
या निवेदनावर अमळनेर परिसरातील अनेक महिलांच्या सह्या असून, प्रशासनाने यावर सकारात्मक कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली आहे.


