डिजिटल पिढी: राकेश वाणी : अखेर जळगाव महानगरपालिकेचे महापौर पदी भाजपच्या दीपमाला काळे व उपमहापौर पदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची वर्णी लागली.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले आणि त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून या पदासाठी प्रामुख्याने तीन महिला नगरसेवकांची नावे चर्चेत होती. प्रभाग क्रमांक 12 मधून बिनविरोध निवडून आलेल्या उज्वला बेंडाळे, प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला काळे तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील वैशाली पाटील यांच्यात चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते.
दरम्यान, आज महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महायुतीकडून नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार जाहीर केले. त्यानुसार भाजपकडून दीपमाला मनोज काळे यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या आज महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, बहुमताच्या जोरावर त्यांची निवड बिनविरोध होणे जवळपास निश्चित मानली जात आहे.
दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 8 मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असल्याने त्यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या नावांची घोषणा करताना जळगावमध्ये आयोजित कार्यक्रमास राज्याचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष बाब म्हणजे, महापौरपदी विराजमान होणाऱ्या दीपमाला काळे आणि उपमहापौरपदी निवड होणारे मनोज चौधरी हे दोघेही नगरसेवक म्हणून यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. आता महापौर आणि उपमहापौर पदावरही त्यांची बिनविरोध निवड होणार असल्याने जळगाव महापालिकेच्या राजकारणात हा एक महत्त्वाचा आणि लक्षवेधी योगायोग मानला जात आहे.


