प्रतिनिधी – जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत 23 मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुख्यालयावर काढण्यात येणाऱ्या संयुक्त मोर्चाबाबत आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाला “निर्णायक लढा” असे संबोधत, राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे कूच करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल करत, देशहिताशी संबंधित प्रश्नांवर तीव्र भूमिका मांडली. तसेच या सर्व मुद्द्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
“हा फक्त मोर्चा नाही, तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णायक एल्गार आहे,” असा ठाम संदेश बैठकीतून देण्यात आला. जनजागरणाच्या माध्यमातून प्रत्येक गाव, प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणात जनसागर उभा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ही बैठक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी हरिश्चंद्र सोनवणे, प्रीतीलाल पवार, जितेंद्र भाऊ केदार, दिगंबर भाऊ सोनवणे, प्रवीण भाऊ सपकाळे, अमित भाऊ तळवी, अनिल दादा लोंढे, रवींद्र ब्राह्मणे, तांदळे साहेब, विनोद बेर भैया, गमीर शेख यांच्यासह जिल्हा, तालुका व महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


