जळगाव: शहराचे व्यापारी हृदय मानल्या जाणाऱ्या सेंट्रल फुले मार्केट परिसरातील समस्यांनी आता टोक गाठले आहे. अपुरी प्रकाश व्यवस्था, अस्वच्छता, पार्किंगचा अभाव आणि अतिक्रमणामुळे या भागाचा श्वास कोंडला असून, नगरसेवक रमेश मतानी आणि व्यापाऱ्यांच्या वतीने महापौरांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंधाराचे साम्राज्य आणि सुरक्षेचा प्रश्न
फुले मार्केट हे सकाळी १० ते उशिरा रात्रीपर्यंत गजबजलेले असते. मात्र, येथील अंतर्गत गल्ल्यांमध्ये पथदिव्यांचा अभाव असून अनेक दिवे बंद अवस्थेत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरी आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पाणी आणि स्वच्छतेचा बोजवारा
बाजारपेठेत पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्याने व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. स्वच्छतेबाबत बोलायचे झाल्यास, कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शौचालयांवर अतिक्रमणांचा विळखा
बाजारपेठेतील सार्वजनिक शौचालयांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काही शौचालयांवर अनधिकृत कब्जा करण्यात आला आहे, तर उर्वरित शौचालयांमध्ये अस्वच्छतेमुळे प्रवेश करणे कठीण झाले आहे. महिला ग्राहकांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची मागणी निवेदनात प्रमुखतेने करण्यात आली आहे.
पार्किंगच्या जागी अतिक्रमण; वाहतूक कोंडीत वाढ
वाहने उभी करण्यासाठी निश्चित केलेल्या जागांवर दुकानदारांनी आणि टपऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ग्राहकांना आपली वाहने रस्त्यावरच लावावी लागत आहेत. यामुळे मार्केट परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शिस्तबद्ध वाहतूक नियंत्रण आणि पार्किंग झोन विकसित करण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे
निवेदनातील प्रमुख मागण्या:
सर्व पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून नवीन दिवे बसवणे.
पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था आणि नियमित पाणीपुरवठा.
शौचालयांवरील अतिक्रमणे हटवून त्यांची नियमित साफसफाई करणे.
पार्किंग क्षेत्रातील अडथळे दूर करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे.
महापौरांनी या प्रकरणी संबंधित विभागांना कडक सूचना देऊन फुले मार्केटचा कायापालट करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आता जोर धरत आहे.


